बायकोचा जाच


तिचं एकदाच लग्न झालं आणि त्यादिवसापासून ती दागिन्यात हरवत गेली; तिला त्या स्वर्णलनकाराची बुरड पडली नाही; तर तिच्या कपाळावर परम्परेने कुंकवाचा आणि आता सुधारित समाजाने टिकलीचा शिक्का मारून पतिव्रता या आजाराचे लक्षण दिसत असल्यामुळे कायमची कोरनटाईन झाली. 


मूलतः शोषणावर आधारित मालकी सिद्ध करू पाहणारी विवाह व्यवस्था आज जगभरात समाज मान्य झाली आहे तिच्या असण्याचा जाच अनेकांना जाणवत असला तरी त्याविरोधात ब्र उच्चारण्याची हिम्मत कोणी करत नाही हे विदारक वास्तव झाकून ठेवून आपण तथाकथित आदर्श जोडीदाराचे उदाहरणे देत फिरतो. राम-सीता, रावण-मंदोदरी, कृष्ण-रुख्मिणी,   आजच्या पडद्यावरच्या अभेनेते-अभिनेत्री सर्वच आम्हाला आदर्श वाटायला लागतात; त्यात गैर काही नाही कारण आपण शोषण करायचे आणि तिने/त्याने मुक्तपणे ते सहन करायचे हाच नित्यक्रम सुरु आहे जर चुकून जाणीव झालीच तर गप्प बसण्यात सर्वजण धन्यता मानतात. 

पुराण काळापासून येथल्या स्त्रियांनी हाच नवरा ७ जन्म मिळावा म्हणून वट पौर्णिमा करायचे ठरवले; पण त्या पुरुषाला हीच बायको पुढचे ७ जन्म हवी आहे का? कोणीच विचारले नाही. मग त्याच्या हक्काचे काय? 

अशा वरवर पाहता अतिमहत्वाच्या वाटणाऱ्या पण निरर्थक प्रश्नांना बाजूला ठेवून महत्वाच्या मुद्द्याला हात घालू. औरंगाबादच्या पत्नीपीढीत संघटनेने पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारून तिच्या जाचाला वाचा फोडली आणि थोडकयात आपला पुरुषी अहंकार बाजूला ठेवून “बायको लै त्रास देते गळ्या”  हे शेवटी मान्य केले. 

स्त्री-पुरुष समतेच्या बाता करणाऱ्या समाजात स्त्रियांचे शोषण होते हे आजवरचे आणि नजीकच्या भविष्यातील सत्य/भाकीत आहे. तरी देखील पुरुष  कधीच शोषणाला बळी पडत नाही असे म्हणणे वास्तवाशी फारकत घेणारे ठरेल म्हणून जी व्यक्ती शोषण करते तीच व्यक्ती कोठे तरी सोशीत असते याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. 


पुरुष प्रधान व्यवस्थेला स्त्रियांचा आधार: गाव-शहर, साक्षर-निरक्षर, गरीब-श्रीमंत समाजाच्या सर्व घटकात अपवाद वगळ्ता लग्नानंतर स्त्री पुरुषाच्या घरी नांदायला जाते अनेक स्त्रिया आडनाव देखील बदलतात हे सर्व काळानुसार अत्यल्प प्रमाणात बदलले आहे; संस्कृतीच्या अंगाने विचार करता भौतिक बदल चटकन स्वीकारणाऱ्या मानवी समाजात अभौतिक बदलांचा स्वीकार करण्याची वृत्ती विकसित होण्यासाठी मोठा काळ जाऊ द्यावा लागतो. आजमितीस मुलींना तिची आई सांगते लग्न झाल्यावर तू फक्त त्याचीच त्यामुळे तोच तुझा सर्वस्व आहे. अशा पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेची पालकी खांद्यावर घेणारी भोई होताना ती कधीच पाऊल पुढे टाकताना आपल्या पायाला बोचणाऱ्या काट्या-गोट्यांचा विचार करत नाही तर त्या पालकीत ऐटीत बसलेल्या समाजपुरुषाच्या सुखाची चिंता करते परिणामी डांबरी रोडसारखे वरून चकचकीत पण आतून पोखरलेले स्त्रियांच्या बाजूचे कायदे पुरुषच हाताळतात एका पुरुषाला अडकवण्यासाठी स्त्रीच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसरा पुरुष त्याचे मनसुबे पूर्ण करतो. आज प्रगतीच्या एव्हरेस्टवर जाऊ पाहणारा भारतीय समाज आणि त्या समाजाला सुरक्षिततेचे कवच प्रधान करणारी जगातील सर्वांत मोठी लोकशाही व्यवस्था; स्वाभाविक अलोकशाही तत्वांवर उभारलेल्या समाजात स्त्रीला कायम मादी म्हणूनच बघत आलाय तो तिला माणूस म्हणून केव्हा जगू देणार? 


अशे स्त्रियांच्या शोषणाचे वास्तवावर आधारित न्यायाच्या निकषावर टिकणारे अनेक दाखले देता येत असले तरी बदलत्या काळानुसार समाजाच्या स्थित्यंतराच्या युगात स्त्रियादेखील पुरुषांचे शोषण करताना दिसतात परिणामी समाजाची पितृसत्ताक व्यवस्था आतून गदा-गदा हलते आहे हि स्वागतार्ह्य बाब असली तरी शेवटी मानवतावादी समाज उभारण्यासाठी मातृसत्ताक कुटुंब व्यवस्था हे उत्तर असू शकत नाही. ज्याप्रमाणे एकाने बलात्कार केला म्हणून त्याच्यावर/तिच्यावर बलात्कार करून न्यायदान केले जात नाही त्याचप्रमाणे पितृसत्ताक व्यवस्थेला मातृसत्ताक व्यवस्था हे उत्तर असू शकत नाही. किंबहुना हे स्त्री मुक्ती चळवळीचे उद्दिष्ट देखील नाही त्यांना देखील शोषण मुक्त समाज अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करायचे असेल तर महिला आयोगाला शह देण्याच्या हेतूने नव्हे तर काळाची गरज लक्षात घेऊन पुरुष आयोगाची स्थापना करायला हवी असे मला वाटते. कायद्याचा वापर करणारे पुरुष, कायदा हाताळणारे पुरुष, त्याला बळी पडणारे पुरुष, हे सर्व  तिच्या मूक संमतीने होत असले तरी ती आता सबला झाली आहे. ती कायमच योग्यच असेल  असे नाही तर ती देखील पुरुषावर अन्याय करू शकते म्हणून ती देखील भा. द. वि. च्या कलमानुसार शिक्षेस पात्र आहे. 


या स्थित्यंतराच्या   काळात लोकशाही शासन पद्धती असणाऱ्या आपल्या देशात प्रत्येकाच्या मानवी हक्काचे जतन व्हावे म्हणून तसेच स्त्री चळवळीचा प्रतिकार करण्यासाठी पुरुष चळवळी जन्माला येऊ नये याची खबरदारी घेऊन समाजात असंतोषाचा प्रकोप होऊ नये यासाठी योग्य पावले उचलायला हवी. जनेकरून सांस्कृतिक प्रतीकात्मक पातळीवर सुरु असणारी पुरुष हक्काची लढाई स्त्रियांच्या स्वातंत्र्याला बाधा निर्माण करणार नाही. आणि रक्ताचा थेम्ब न सांडवता एकदिवस पुरुषप्रधान व्यवस्था जाऊन मानवतावादी समाज निर्माण होईल अशा समाज क्रांतीसाठी चला आपण खारीचा वाटा उचलू. 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा