संत व्हॅलेंटाईन यास पत्र


प्रिय संत व्हॅलेंटाईन, 

प्रेम स्पर्शचा साष्टांग नमस्कार. 

आपण प्रेमासाठी शहीद झालात म्हणून तुमच्या स्मृत्यर्थ सुमारे १७०० वर्षांपासून सुरु झालेला प्रेम दिवस आज सम्पूर्ण जगात आनंदाने साजरा केला जातोय. हे पत्र तुमच्यासाठी लिहीत  असलो तरी गोपनीय नाही म्हणून इतर वाचकांना तुमची थोडक्यात ओळख करून देणे आवश्यक वाटते. 

सर्व  प्रेमात न्हाऊन जाणाऱ्या मानवांसाठी आपल्या आदर्शाचा परिचय- रोमन राज्यातील एक राजा फार निर्दयी होता; त्याच्यामते भौतिक सुख मिळवणे एक मात्र आयुष्याचे उदात्त ध्येय असावे प्रेम वैगेरे त्याच्या मते शुल्लक गोष्टी आहेत. म्हणून त्याने आपल्या सैनिकांना प्रेम तसेच विवाह करायला मनाई केली. त्या विरोधात आपण राजाला आव्हान देण्यासाठी एकटे उभे ठाकला कारण तुम्ही अनेक सैनिकांचे विवाह लावून दिले होते. परिणामी तुम्हाला फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली; तुरुंगात असताना  राजकुमारी तुमच्या प्रेमात पडली आपल्या फाशीच्या एक दिवस आधी प्रेयसीला पत्र लिहिताना शेवटचे वाक्य सर्वानाच भावुक करणारे होते ‘तुझाच व्हॅलेंटाईन’ 

आजच्याच दिवशी आपण फासावर चदलात  जगाला प्रेमाचे महत्व पटवून देण्यासाठी. 

कोणी हि, कोणावर हि, केव्हा हि, कसे हि,  सर्वस्व अर्पण करून प्रेम करावे. रंग, रूप, भाषा, प्रांत, वंश, अगदी लिंग वैगेरेचा   अडथडा दूर करून सर्वांठायी विधात्याचे अस्तित्व शोधावे यालाच आपण प्रेम म्हणावे. 

पण आज प्रेमाचं 

काय झालंय? स्वार्थ, द्वेष, अहंकार, तथाकथित प्रतिष्ठा, जाती-धर्माचे वर्चस्व  साऱ्यांचं ऊत आलंय 

तरी हि प्रेम करायचं मानव म्हणून जगण्यासाठी, द्वेषाने भरलेल्या जगात मानवी मूल्य पेरण्यासाठी, असतील काहींचे मनसुबे मानवता सम्पवण्याचे नाही तर रक्तपात घडवण्याचे, म्हणून चला जाऊ गुलाब हाती धरून बंदुकीला उत्तर देण्यासाठी, 

छातीची  ढाल करू फक्त निस्वार्थी प्रेम करण्यासाठी. 

आपणास कळवताना फार वेदना होतात पण वास्तव तुमच्यापर्यंत पोहचवणे त्यावर माझी भूमिका मांडणे एक शिष्य म्हणून मला गरजेचे वाटते. आज एक तर्फी प्रेमातून अनेकांची हत्या होते, ज्यांच्यावर एकेकाळी जीव ओतून प्रेम केले त्यांनाच पेट्रोल टाकून जाळले जाते, काळ-पर्वा ओळख झालेल्या तिच्या-त्याच्यासाठी जन्मदात्यांना घरा बाहेर काढले जाते, आपल्या मुलीने स्वमर्जीने लग्न केले म्हणून तिला जन्मदात्यांकरवी यमसदनी धाडले जाते, अनैतिक संबंधाला प्रेमाची झालर लावून मुलं जन्माला घातली जातात मग याच माय-बापानी  अशा चिमुरड्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकल्याच्या घटना येथे घडल्याच्या बातम्या येतात; दुःख एवढंच हे सर्व सर्वकाळ घडत आलं असलं तरी त्याला प्रेमाच्या आठवड्यात देखील पूर्णविराम अथवा अर्धविराम  लागलाच नाही. हे पत्र मी ज्या मराठी मातीवर अश्रूंची शाई करून लिहीत आहे तो महाराष्ट्र यासारख्या घटनांनी नुकताच हळहळला तो मात्र आता शांत झाला; कारण अशी हृदयद्रावक घटना घडल्यावर तो पुन्हा अश्रुना वाट मोकडी करून देणार आहे अत्यन्त भावुक होऊन आरोपीना चौकात गोळी घालण्याची भाषा बोलणार आहे. पण मला समजत नाही आपण प्रेम बळी जाणे केव्हा थांबवणार? 

एकदाच मिळणारे आयुष्य बेधुंद होऊन जगायचे, याच जिन्दगीत जगण्याचा मनमुराद आनंद लुटायचा, कोणता देव वैगेरे पाप-पुण्याचा हिशेब ठेवण्यासाठी कोठे हातात लेखणी घेऊन बसला नाही म्हणून वाटेल तसे वागायचे, हवे ते ओरबाडून घ्यायचे, इतर लोक अन्नावाचून तडफडत मेले तरी चालेल पण आपल्या १०० पिढयांना पुरून उरेल एवढ्या संपत्तीचे संग्रहण करायचे, तरी हि कोणी जनतेचा वैगेरे कळवळा घेऊन आवाज उठवत असेल तर ४ पैसे त्याच्या/तिच्या हातावर टेकवायचे, जर याने गप्प बसत नसेल तर थेट गोळी घालून सम्पवायचे, काही पुस्तकी किडे वैचारिक लढाई लढण्यासाठी आलेच तर धर्माच्या नाही तर देशाच्या अस्मितेचे अस्त्र वापरून मेंदूची झीज न होता त्यांना नमवायचे, आणि खुशाल उघड माथ्याने  राजकारणाद्वारे समाजकारण करणारा समाज सेवक म्हणवून घ्यायचे, कोणाला काही हि वाटो काही कोटी दिल्ली दरबारी अर्पण करून एखादा नागरी गौरव पुरस्कार नावावर करून घ्यायचा. 

आपल्या पश्चात स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्मारक उभारावे एवढी तरतूद करायला जीवंत असताना विसरू नये मग झाले. 

याला काही अपवाद असले तरी अनेक जनतेवर अपार प्रेम असणारे लोक प्रतिनिधी अशेच वागतात हे सर्वाना ठाऊक असताना आपल्या प्रियव्यक्तीला प्रश्न विचारण्याचे धाडस कोणी करत नाही हि सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. 

प्रिय व्हॅलेंटाईन मला असे वाटते प्रेमाच्या नात्यात व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केलाच पाहिजे आणि प्रेम म्हणजे भिन्न लिंगी व्यक्तीचे आकर्षण नसून तो सृष्टीच्या विस्कटलेल्या घटकांना एकत्र गुंफण्याचा एक धागा आहे हे प्रेमाचे व्यापक आणि चिरकाल वास्तव सर्वानी स्वीकारावे. 

व्यक्तीपेक्षा समाज मोठा असतो म्हणून स्वतः पलीकडे पाहून व्यक्तीला तसेच परिस्थितीला आहे त्या तसे जवळ करून त्यात आपल्या आवडीनुसार शक्य तेवढे बदल करण्याचा प्रयत्न करावा. मृतित्व  सर्वांसाठी अटळ आहे पृथ्वीवरच्या कोणत्याच दुकानात आयुष्याचा एक क्षण विकत घेता येत नाही; पण याच पृथ्वीवर कोणत्या हि कोपऱ्यात आयुष्याचा प्रत्येक क्षण सुंदर /आनंददायी करण्याची क्षमता आहे. म्हणून निराशेतून आशेकडे, दुःखातून समाधानाकडे, वैमनश्यातून मित्रत्वाकडे   जाणारा पूल प्रेमाने निर्माण केला आहे चला या मार्गाने प्रवास करू आणि ‘अवघाचि संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी’ या संत वचनाला आचरणात उतरवू. 

कळवावे, 

आपला स्नेही प्रेम स्पर्श , 

दिनांक १४/०२/२०२२ 



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा