शेवटि तिचे ही लग्न झालेच


हे जीवन सुंदर आहे असे आपण कायम म्हणत असतो पण सौंदर्याचा शोध कोठे घ्यायचा हे मात्र ज्याने-त्याने ठरवायचं असते. कुणाला ते गोऱ्यागोमट्या चेहऱ्यात सापडते तर कुणाला संघर्षाच्या वाटेवरून प्रवास करणाऱ्या वाटसरूच्या कर्तृत्वात घावते काही मात्र व्यक्तीचा गुण     स्वभावात / वर्तवणुकीत सौंदर्य शोधतात त्यामुळेच कदाचित असे प्रेमी जगावेगळे ठरतात. 

स्त्री-पुरुषांमध्ये विवाह होणे सामान्य बाब आहे. एखाद्या सर्वसामान्य मुलाने / मुलीने दिव्यांग व्यक्तीबरोबर रेशीमगाठ बांधली तर समाजाचे तिकडे लक्ष वेधले जाते. पण धडधाकट असणाऱ्या व्यक्तीने तृतीयपंथी जोडीदार निवडला तर मात्र समाज परिवर्तनाची मशाल पेटवली जाते. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीड शहरात किन्नर सपना आणि बाळू या प्रेमी जोडप्याने अनेक प्रतिष्ठित व्यक्तीच्या साक्षीने पुढील कित्त्येक पिढयांना प्रकाश देणारी मशाल पेटवली. 

या विवाहाची तेव्हापासून राज्यभर जोरदार चर्चा सुरु आहे या आधी गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यात असाच एक ऐतिहासिक विवाह संपन्न झाला होता त्याबद्दल वाचण्यासाठी– ऐतिहासिक विवाह  

सपना आणि बाळू यांच्याविषयी थोडक्यात- अमर उर्फ सपना शिक्षण १२-वि बाळू ७-वि अर्थात तुमच्या-माझ्या सारख्या डिग्र्या वैगेरे मिळवून समाजात तथाकथित प्रतिष्ठेपासून अंतर ठेवून असलेले परिणामी अहंकाराचा दंश न झालेले प्रेमी. दोघे हि लोककलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणारे सच्च्या दिलाचे कलाकार; आणि हो जागरूक प्रेमी सुद्धा कारण त्यांनी तब्ब्ल अडीच वर्ष एकत्र घालवून विचारांती हा निर्णय घेतला. 

एकदा निर्णय घेतल्यावर त्यांनी तो सार्थ ठरवला त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची त्यांची तयारी आहे म्हणून हे शक्य झाले असावे. 


बाळू यांचे जीवन तसे सामान्य होते अगदी हातावर पोट असणाऱ्या अनेकांसारखे पण सपना यांच्याबाबतीत मात्र नियतीने प्रत्येक पावलावर संघर्ष लिहून ठेवला होता. जेव्हा त्या इतरांपेक्षा वेगळ्या आहेत हे स्पष्ट झाले त्यापासून त्यांचे व त्यांच्या कुटुंबाचे जीवन जगणे असह्य झाले समाजाचे टोचून बोलणे त्यांचे काळीज चिरत असे. त्यांनी वडिलांसह एकदा आत्महत्या करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. 

सपना घरात असल्यामुळे त्यांच्या बहिणीचे लग्न होणार नाहीत त्यांना स्थळ येणार नाही याची सर्वाना भीती होती त्यामुळे शेवटी आपल्या वेगळे असण्याचा कुटुंबातील इतर सदस्यांच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ नये म्हणून त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्या सांगतात ‘कोणत्या हि आई-वडिलांना  आपला वंश घरापासून दुरावू नये असेच वाटते पण समाज तृतीयपंथी लोकांना सन्मानाने जगू देत नाही म्हणून त्यांना घरा बाहेर पडावे लागते’ 

त्यांनी घर सोडल्यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले त्या इतर तृतीयपंथी व्यक्तींप्रमाणे जगू लागल्या रस्त्यावर पैसे मागण्यापासून लोकांच्या अश्लील टिपण्या सहनकर्ण्याची त्यांच्यावर परिस्थिती ओढवली. त्यातून बाहेर पडून त्यांनी लोककलेच्या  क्षेत्रात नशीब आजमावले आणि हो तिथेच बाळूच्या रूपाने त्या नवीन आयुष्याचा जोडीदार सापडला. 


काही दिवस एकत्र काम केल्यावर लैंगिक आकर्षण आणि ते वजा करून २ हृदय जुडल्यावर निर्माण होणारे पवित्र प्रेम यातील फरक समजणाऱ्या बाळू यांनी सपना याना तसा प्रस्ताव दिला आणि अर्थात तो फेटाळण्यात आला कदाचित सपना यांच्या पूर्व आयुष्यातील काही कटू आठवणींची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून घेतलेला हा विचारपूर्वक निर्णय असेल; बाळू यांनी परत असाच प्रस्ताव दिला तेव्हा मात्र त्यांनी सोबत राहायला बोलवले आणि एकमेकांना समजून घेतले. केवळ हा पुरुष आपली फार काळजी घेतो म्हणून त्यांनी चटकन विश्वास ठेवला नाही तर प्रेमाची परीक्षा घेतली. तुम्हाला कदाचित अतिशयोक्ती वाटत असेल पण खरच त्यांनी प्रेमाची परीक्षा घेतली हे शक्य आहे. यावर कधी तरी नंतर बोलू तूर्त या प्रकरणापुरता विचार करू. 

सपना यांनी बाळूकडे १०००० रुपय ठेवायला दिले पण बाळू पळून गेले नाहीत अथवा त्यांनी १ रुपया देखील खर्च केला नाही; कदाचित हि छोटी रक्कम असावी म्हणून त्याने असे काही केले नसेल म्हणून नंतर ५०००० रुपय दिले तरी देखील त्यांनी चुकीचे असे काही केले नाही. त्यावरून सपना यांचा बाळूच्या प्रेमावर विश्वास दृढ झाला. 

वास्तविक पाहता बाळू एखाद्या स्त्रीबरोबर लग्न करू शकले असते पण त्यांनी तसे समाजाला खुश करण्यासाठी केले नाही तर आतला आवाज ऐकला. जशी  प्रत्येक स्त्रीची आई होण्याची इच्छा असते तशीच प्रत्येक पुरुषाची बाबा होण्याची इच्छा असते पण या जोडप्याला नैसर्गिक रित्या आई-बाबा होता येणार नाही. 

यामुळेच बाळूच्या कुटूंबियांची या लग्नाला सहमती नव्हती. त्यामुळेच बाळू यांचे अधिक कौतुक वाटते आपण आयुष्यात वडील होणार नाही तरी देखील या प्रेयसीबरोबर लग्न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला हे खरोखरच सगळ्यांचे डोळे उघडणारे आहे. या नवविवाहित जोडप्याला त्यांच्या सांसारिक आयुष्यासाठी खूप-खूप शुभेच्छा 


आज हे सर्व लिहिताना स्वतःच्या हाताने तोंडावर २ थापडी मारून घ्याव्या असे वाटते कारण स्वतःला संवेदनशील वैगेरे समजणारा मी जेव्हा माझ्या मित्र परिवारात डोकावून पाहतो तेव्हा त्यात एक हि तृतीयपंथी व्यक्ती नसल्याची जाणीव होते. म्हणून मला असे वाटते कि किमान अशा उदाहरणातून प्रेरणा घेऊन त्यांना देखील वेगळे न समजता त्यांच्याशी मैत्रीभाव जपावा. 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा