कळपातील माणूस
या हिरवागार वाळवंटात माझं काळीज आतून होरपडून निघालं
वरून सहानुभूतीचा मुलामा आतून भावनांचा उद्रेक त्यात तीळ-तीळ माझा स्वाभिमान जळतोय कारण मला देखील माझ्या शारिरीक अभावातून अस्तित्व निर्माण करायचं आहे.
पण खर्च ते मला करता येणार का?
हा निर्थक प्रश्न माझ्या मनात घर करून बसला कारण स्वतःच्या नजरेत माझी या समाजाने नकारात्मक प्रतिमा निर्माण केली.
एकीकडे प्रचंड सहानुभूती मिळते तर कुठे मला देवदूत समजतात; तर मोठ्याप्रमाणात गेल्या जन्मातील पापी, ऐतखाऊ, भिकार्डा नाही तर जमीनीला भार म्हणून हिंवतात.
पण या बुद्धी शत्रू मानवाना माझ्यातील माणूस केव्हा कळणार का?
काही अपवाद वगळले तर बहुतांशी दिव्यांग व्यक्तीची थोड्याफार अंतराने हि शोकांतिका आहे.
म्हणून जागतिक अपंग दिनाचे अवचित्य साधून अंतर्मनात डोकावणारा सामान्यांच्या डोळ्यासमोर दर्पण पकडणारा लेख
“Happy wold handicapped day” जागतिक अपंग दिनाच्या सर्वाना शुभेच्छा
आज मला लक्षावधी भावंडांच्या काळजाला हात घालायचा आहे, त्यांच्या मनातील खदखदणारा असंतोष जनतेसमोर मांडायचा आहे, आजवर आमच्या हक्काचे जे-जे म्हणून हिरावले ते सर्व मिळवायचे आहे, समाजाच्या नाकर्तेपणाचा विरोधात विद्रोह करायचा आहे, अनेक पिढीतांना न्याय द्यायचा आहे, न्यायाधीश समाजाचे डोळे उघडायचे आहेत.
एखाद्या व्यक्तीला जन्मतःच देव म्हणा कि निसर्ग एखादा अवयव देत नाही अथवा त्याचा / तिचा एखादा अवयव पूर्ण क्षमतेने काम करत नाही त्याला आपण अपंग म्हणतो. कारण दिव्यांग हा शब्द अशा सर्वांची चेष्टा करणारा आहे तरी देखील तुम्हाला वाटेल ते म्हणण्यास माझी हरकत नाही.
आपल्या समाजात सामान्यांचे कायम लिंगाच्या, रूपाच्या, जातीच्या, धर्माच्या आधारे शोषण होते त्या समाजात शारिरीक दृष्ट्या वेगळे असणाऱ्यांची काय स्थिती असणार याची कल्पनाच करा.
आज थोडेफार शिक्षण घेऊन वयाने आणि किंचित विचाराने समजदार झाल्यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहण्या इतपत माझ्यात बळ आले आहे आयुष्यात स्वतःच्या मेहनतीवर पोट भरण्याचा आत्मविश्वास वाटतो तरी देखील क्षणोक्षणी माझ्या विशेष असण्याची जाणीव होतच असते.
पण मला कायम एक प्रश्न पडतो ज्यांना इतरांच्या दयेवर जगावे लागते ते देखील माझ्यासारखे रात्री आनंदाने झोपत असतील का?
आज माझे मित्र मला वेगळं समजत नाहीत मग माझ्यासारख्या जगाशी टक्कर घेऊ पाहणाऱ्या असंख्य बंडू-भगिनींना अशेच जिवाभावाचे मित्र-मैत्रीनि मिळत असतील का?
हे आणि असे कितीतरी प्रश्न विचारण्या आधी त्याची दृश्य स्वरूपात उत्तर माझ्याकडे आहेत. जर खर्च शाळा / महाविद्यालयातील सामान्य मुलांनी आपल्या अपंग मित्र-मैत्रिणीला आपल्यात सामावून घेतले असते तर आज त्यांच्यावर हातावरहात ठेवून बसण्याची वेळच आली नसती.
पण कुठे तरी दोन्ही बाजूनी कमतरता राहिली हे मान्य करावे लागेल.
मुलांच्या संगोपनावरून त्यांचे ५० टक्के भविष्य घडते. दिव्यांग मुलांचे संगोपन कसे करावे?
तंत्रज्ञानाच्या युगात मानवाने मोठी भरारी घेतली त्याचा सर्वांप्रमाणे आमच्या आयुष्यात देखील क्रांतिकारक परिणाम झाला.
डोळे असणाऱ्यांचे आणि नसणार्यांचे अंतर फार कमी झाले हे स्वानुभवातून कथन करतो.
आज सर्वत्र दिव्यांग कर्मचारी कार्यरत असल्याचे अनेक अस्तापणात निदर्शनात येतात, अनेकांनी स्वतःचे बंगले उभे केले, कित्त्येकानी देशासाठी पदके पटकावली, बहुतांशी बांधवानी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रशासनातील उच्च पदे भूषवली, बऱ्याच लोकांनी समाज सेवेचा वसा हाती घेतला, अनेकांनी स्वयं उद्योगातून पुढे मोठ्या कंपनीत रूपान्तर केले आणि देशाच्या अर्थ व्यवस्थेत भर घातली पण दुर्दैव असे कि या यशवंतांची संख्या बोटावर मोजण्या एवढीच आहे.
याचा अर्थ फार थोड्या लोकांना पोषक वातावरण मिळते; बाकी अनेकांना क्षमता असून स्वतःचा विकास करवून घेता येत नाही.
अपंगांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करून देण्याची जवाबदारी कोणाची?
शासन, संस्था, समाज, व्यक्ती या सर्वाना याचे उत्तर द्यावे लागेल.
अनेक अपंग व्यक्तींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नेत्रदीपक यश मिळवले मग जर त्यांना शक्य आहे तर तुम्हाला का नाही?
स्वतःचा सर्वनगीन विकास साधण्याची जवाबदारी आपण इतरांवर कशी ढकलू शकतो? माझ्या सर्व बंधू-भगिनींनी याचा विचार करावा.
आज अनेकांनी सेवेच्या नावाने कायदेशीर लुटीचे अड्डे सुरु केले शासन दरबारी स्वयंसेवी संस्थेच्या यादीत या डाकूंनी आपली नोंदणी देखील केली आहे.
सर्वस्व झोकून काम करणाऱ्या सर्वांची मापी मागतो कारण मला तुम्हाला या लुटारुंच्या रांगेत बसवता येणार नाही.
या सर्व संस्थांचे उत्तरदायित्व निश्चित केले पाहीजे त्यांच्या कामाचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे.
शेकडोंच्या संख्येत संस्था असताना सार्वजनिक ठिकाणी अनेक अपंग व्यक्ती भीक मागत का फिरतात?
याचे प्रमाण प्रचंड आहे काहींचा तर प्रत्येक अपंग हा भिकारीच असतो असा समज झाला आहे.
अनेकांनी मला देखील त्याच श्रेणीत बसवले.
अशा वेळी राग आणि रड एकाच वेळी येतात त्याचबरोबर त्या माणसाच्या बुद्धीची कीव देखील येते.
या सर्व संस्थांनी जर ठरवले तर सर्व अपंगांचे पुनर्वसन शक्य आहे; पण दररोज सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कोण कापणार?
या युगाला तंत्रज्ञानाचे युग म्हणतात पण आजदेखील परीक्षेसाठी दृष्टिबाधित व्यक्तीला लेखनिकाची मदत घ्यावी लागते आमच्या मायबाप सरकारने त्यावर पर्याय म्हणून सुलभ तंत्रस्नेही व्यवस्था निर्माण केली नाही.
प्रवास भाड्यात काही टक्के सवलत देऊन उपकार केले असले तरी आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याची जवाबदारी मात्र झटकली.
नोकऱ्यांमध्ये काही जागा आरक्षित नक्की ठेवल्या पण उद्योजकता वाढीसाठी प्रोत्साहन आवश्यक प्रमाणात दिले नाही.
आपण सर्व समाजशील प्राणी असल्यामुळे आपल्या कळपातील सर्वाना समान वागणूक मिल्ने अशक्य आहे; कारण त्यासाठी कळपातून बाहेर पडुन सब्य मानवी वस्तीत मुक्कामाला जावे लागणार.
पण खरं सांगायचे झाल्यास इथे देखील अपंग व्यक्तींविषयी गैरसमजच अधिक आहेत.
काबील चित्रपट प्रदर्शित झाला आणि माझ्यावर दगडाप्रमाणे प्रश्नांचा वर्षाव सुरु झाला.
चित्रपट निर्मात्याने कोट्यवधी रुपये जमवले असतील पण अंध व्यक्तीविषयी कितीतरीपट जास्त गैरसमज पसरवले.
आता समाज प्रबोधन करायला हे निर्माते त्यातील एखादा रुपया देतील का?
शेवटी समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून अपंग व्यक्तीबरोबर व्यवहार करणे अपेक्षित आहे.
तुमचे काही शब्द काळजाला वृत्तात तर एखादा प्रेमाचा पाठीवरचा हात कळसुबाई सर करण्याचे बळ देते.
आमच्याशी वागताना उपकारापेक्षा कर्तव्याच्या भावनेने वागा.
महाविद्यालयात गेल्यापासून अनेक विद्यार्थी मित्र-मैत्रिणीला माझ्या अभ्यासाचे प्रचंड कवतुक वाटते कदाचित म्हणूनच मला ते वेगळे वागवत नाहीत त्यांच्यातीलच एक समजतात त्यामुळेच मला माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचा अभिमान वाटतो.
पण जसे अनेक मूल-मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात तश्याच भावना माझ्या हि मनात आहेत पण एकही मुलगी माझ्या भावना समजून घेत नाही याचेच आश्चर्य वाटते.
सुंदर चेहऱ्यापेक्षा शुद्ध अंतःकरण यांच्या मनाला भावत नाही का?
हे सर्व येथे मांडून मला स्वार्थ साधायचा नाही तर समाजाच्या एका जखमेवरचे खिप्पल काढायचे आहे.
नोकरी करणाऱ्या दृष्टिबाधित तरुणांबरोबर एखाद्या गरीब घरातली कमी शिकलेली मुलगी संसार थाटायला तयार होते मग ती मुलगी पैसे पाहून लग्न करते कि त्याच्याकडे बघून नांदायला जाते?
आज सुखावणारी बाब एवढीच आहे कि हे अंतर दिवसागणिक कमी-कमी होत आहे माझ्या अनेक द्रुष्टीआव्हानित मित्र-मैत्रिणीला त्यांच्या महाविद्यालयात चांगले सहकार्य मिळते तरी देखील मोठा टप्पा गाठायचा आहे.
एक दिवस विविध ठिकाणी महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करणारे द्रुष्टीआव्हानित विद्यार्थी समोर यायचे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात काम करायची सामान्य विद्यार्थ्यांची मानसिकता तयार व्हायला अद्याप अवकाश आहे. हि प्रक्रिया शावकाश जरी घडत असली तरी अटळ आहे.
ज्या दिवशी सामान्य प्रियकर त्याची प्रियसी दिव्यांग मुलीत शोधेल त्याचबरोबर सामान्य मुलगी तिचा प्रियकर दिव्यांग मुलात शोधेल त्या दिवशी हि प्रक्रिया पूर्ण होईल.
कदाचित माझ्या पिढीच्या नशिबात हे नसले तरी उद्याच्या पिढ्या नक्की अनुभवतीळ असा विश्वास वाटतो.
फोटो - साभार गूगल
समर्पक मांडणी👍
उत्तर द्याहटवा