तो ती होते तेव्हा
लक्षावधी वर्षाचा प्रवास करून विविध अवस्थांतून बदल घडत मनुष्याने विज्ञान युगात प्रवेश केला असून काळाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याने आपल्या प्रगतीचे ठसे उमटवले आहेत.
भौतिक-अभौतिक विचारातून त्याचे हे वर्तमान स्वरूप अद्याप देखील बिनभरोशाचे आहे.
स्त्रीच्या गर्भातून जन्माला येणाऱ्या अभर्काला स्त्री अथवा पुरुष या लिंग भावावर आधारित सामाजिक मान्यता मिळते.
पण जे या लैंगिक साच्यात बसत नाही त्यांचे काय?
स्त्री-पुरुष खेरीज मानवी अभर्काला माणूस म्हणून जन्माला येता येईल का?
सहिष्णुतेचे किती हि फलक झडकवले किव्हा सामाजिक स्वीकृतीची किती हि जाहिरात केली तरी अशा आभासी प्रचारातून कठोर वास्तव बदलत नसते कारण ते सत्य परिस्थितीचे दर्शन घडवते.
आज नोकरीसाठी तथा शाळा/महाविद्यालयात प्रवेश घेणयासाठी प्रतिज्ञापत्रात तृतीयपणती व्यक्तीसाठी रकाना असतो; पण आपल्या काळजात त्यांच्या करीता प्रेमाचा कोपरा आहे का?
या सामाजिक जडण-घडणीत वाढलेल्या आई-वडिलांना आपल्या लेकराचा तृतीयपंथी म्हणून स्वीकार करणे किती आव्हानात्मक असेल याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो.
पण समाजात फक्त तृतीयपंथी व्यक्तीचीच अवहेलना होते का?
तर याचे हि उत्तर होकारार्थी देता येत नाही कारण दिव्यांग व्यक्तींचे देखील जीवन अद्याप सुसह्य नाही. कारण त्यांच्याबाबतीत अनेक गैरसमज पसरले आहेत.
दिव्यांग मुलांचे संगोपन कसे करावे?
सामाजिक वास्तवाकडे तर्काच्या चष्म्यातून करुणेच्या नजरेने पाहिले तर स्त्री-पुरुष यापेक्षा वेगळे असणाऱ्या माणसांची अधिक उपेक्षा होत असल्याचे वास्तव निदर्शनास येते.
देशाच्या आर्थिक राजधानीत एक मध्यम वर्गी कुटुंब घड्याळाच्या टिक-टिक तालावर नाचून कसेबसे अर्थार्जन करत पोटाची खडगी भरत होते; त्यांच्या कष्ट उपसण्याचा क्षमतेमुळे आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी कोणासमोर हात पसरवण्याची या कुटुंबावर कधी हि वेळ आली नाही इतकीच काय ते जमेची बाजू.
पण या गोसावी कुटुंबातील कर्त्या पुरुषाला देवाज्ञा झाली आणि अखखे कुटुंब राम भरोसे जीवन जगू लागले.
प्रत्येक आईच्या ठायी ईश्वराचा वास असतो तसा मातेच्या रूपात या कुटुंबातील मुलांसाठी तो धावून आला.
अनेक अड्थडे पार्करून त्यांची गाडी शेवटी रुळावर आली.
मुले जशी-जशी मोठी होऊ लागली तसतसा आईचा ताण कमी होणे स्वाभाविक होते.
किशोर वयात आलेल्या निशांतने नोकरी पकडली आणि छोट्या भावाच्या शिक्षणाला मदत करू लागला; इथवर सर्व सामान्य होते.
पण हा निशांत एक गुणी मुलगा असला तरी राहणीमानावरून आई सोबत त्याचे नेहमी भांडण होतहोते आई त्याला मनासारखे वागू देत नसल्यामुळे त्याला तिचा फार राग यायचा;
पण तो काही वेसनी नव्हता, मुली फिरवण्याची त्याची आवड नव्हती, तो महागडे कपडे वैगेरे घेण्यासाठी आईकडे पैश्याचा तगादा देखील लावत नसे
त्याला फक्त मुलींसारखे कपडे घालायचे होते.
आईला हेच खटकायचे मुलगा असून त्याने मुलींचे कपडे घालणे म्हणजे काय याचा अर्थ तिला लावता यावा एवढे तिच्यावर सामाजिक संस्कार करण्याइतपत आपला समाज प्रगत झाला नाही.
एक दिवस तो पोहण्यासाठी गेला असता परत येताना अचानक एल्फिन्स्टन रोडवर तो पडला; कदाचित मनावरचा ताण असह्य झाल्यामुळे असे झाले असावे.
मग त्याला त्रयस्थ व्यक्तीने नजीकच्या रुग्णालयात नेले.
डॉक्तरांनी प्राथमिक उपचार केल्यावर त्याच्याशी सम्वाद सुरु केला त्यातूनच त्यांना खऱ्या आजाराचे मूळ सापडले लगेच त्यांनी निशांतच्या आईला बोलावून घेतले आणि सांगितले “तुम्हाला वास्तव स्वीकारावेच लागेल”
पण हे ऐकून त्यांच्या नेमके प्रकरण काय ते लक्षात येई ना म्हणून त्यांनी विचारले, “वास्तव काय आहे?”
डॉक्तरांनी शांतपणे सांगितले, “आजवर तुम्ही ज्याला मुलगा म्हणून वाढवले तो मुलगा नाही; तर ट्रान्स आहे.”
त्यावेळी ट्रान्स म्हणजे काय हे त्यांना पूर्णपणे ठाऊक नसले तरी हा इतरांच्यापेक्षा वेगळा आहे याची जाणीव झाली.
तृतीयपंथी लोकांचे जीवन कसे असते?
घराबाहेर पडलेला निशांत घरात निष्ठा म्हणून आली; कधी हि न बदलणारे सत्य असले तरी ते सहजासहजी स्वीकारणे आईच्या अंतःकरणाला शक्य नाही.
हि बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरली.
ती बाहेर पडताना कोणते कपडे घालते?
लिपिस्टिक वैगेरे लावते का?
कशी चालते?
याकडे टवाळखोर लोक टक लावून बघायचे.
निष्ठांचे आयुष्य सुसह्य झाले असले तरी आईची मुलाला मुलगी म्हणून स्वीकारण्याची मानसिक तयारी होत नव्हती.
दरम्यान फुकटचे निरर्थक सल्ले देणाऱ्या नातलगांच्या झुंडी त्यांच्या घरी यायला सुरुवात झाली हे नव्याने सांगायला नको.
अनेकांनी तिला घरातून काढून टाकण्याचा सल्ला दिला पण सुप्रिया गोसावी सांगतात “माझ्या निष्ठाला घरातून काढावे हा विचार माझ्या मनात कधी हि आला नाही”
आईचच काळीज ते पोटच्या गोळ्याला कसं दूर करणार?
पण समाजातील कित्त्येक मातांना सामाजिक दबावाला बळी पडून आपल्या लेकराला रस्त्यावर सोडून द्यावे लागते.
सुप्रिया काकूसारख्या आई आणि निष्ठा ताई सारख्या मुली अपवादानेच आढळतात.
हे भयावह वास्तव असले तरी याच समाजात काही आशेचे किरण देखील आहेत एका सामान्य मुलाने तृतीयपंथी मुलीबरोबर प्रेम विवाह केला.
असे मी तुम्हाला सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही म्हणून नक्की वाचा--
आपण स्त्री-पुरुष यापेक्षा वेगळे असणाऱ्या माणसांवर प्रेम करायला शिकायला हवे.
त्यांच्या लैंगिक भावना कशा असतात?
ते कुटुंबाची कोणती व्याख्या करतात?
जोडीदाराकडून त्यांना काय अपेक्षित आहे?
त्यांना कोणत्या तर्हेचे जीवन जगायला आवडते?
यासारख्या प्रश्नांची उत्तरे देणे मला शक्य नाही.
पण समाजाकडून होणाऱ्या चेष्टेचा त्यांना निश्चित त्रास होत असेल एवढे नक्की.
सामाजिक प्राणी म्हणून सर्वांशी सौजन्याने वागणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे.
तृतीयपंथी लोकांच्या अंतर्मनात न डोकावता आपण त्यांना देखील मानवी समूहात माणसांसोबत राहायला नक्की आवडेल हा तर्क काढू शकतो
म्हणून चला आता त्यांच्याबरोबर मैत्री करून आतापर्यंत झालेल्या चुकांची माफी माघु.
फोटो - साभार गूगल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा