प्रिय गुरुजी, एका विद्यार्थ्यांचे पत्र
शाळा / महाविद्यालयात शिकत असताना सर्व शिक्षकांनी माझ्यावर उत्तम संस्कार केले त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करण्यासाठी अशा सर्व शिक्षकांना समर्पित एक शिक्षक दिनी खुले पत्र शिक्षक हे गुरु असतात पण गुरु म्हणायचे कुणाला? https://www.premsparsh.com/2021/07/blog-post_24.htmप्रिय गुरुजी,
अनेक दिवसांपासून साचलेल्या भावना आज तुमच्यासमोर व्यक्त करण्यासाठी मी हे पत्र लिहीत आहे. वाचल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर त्यासाठी मला माफ करा.
ज्या वयात शाळेत आलो तेव्हापासून आता मी पदवी मिळवली असली तरी मी तुमच्यासाठी अद्याप लहान बाळ आहे याचा मला गर्व वाटतो कारण अगदी तारुण्यात माझ्यातील चिकित्सक बालक तुम्ही जिवंत ठेवला याचे अप्रूप वाटते.
जन्मापासून हे सुंदर जग मला माझ्या डोळ्यांनी पाहता आले नाही; पण गुरुजी दृष्टी नसताना जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुम्ही मला दाखवला आज त्यामुळेच मी ज्ञान ज्योतीद्वारे प्रकाश वाट धुंडाळतो आहे.
सर मी शाळेत असताना तुम्ही फार शिस्त प्रिय होते त्यामुळे मला असं शिस्तीत जगणं माझ्या बालपणावरचा हल्ला वाटत असे; पण आता मला त्यातील गमक उमगले आहे कारण त्यामुळे आज मी स्वयं शिस्त असलेला विद्यार्थी होऊ शकलो; खरं सांगायचे तर आज माझ्यातील बेभान तारुण्यावर लगाम लावायला तुम्ही माझ्यासोबत कायम राहू शकत नाही याची खंत वाटते.
सुरुवातीला मला दिसत नाही म्हणून आई-बाबा कायम माझ्या भविष्याबद्दल चिंता करायचे पण तुम्ही त्यांच्या मनातील भीती संपवली; आणि केवळ शब्दांचा आधार दिला नाही तर माझ्यातील ओबड-धोबड दगडावर कोरीव काम करून माझे उत्तम शिल्प घडवले.
मी पहिल्या वर्गापासून वसतिगृहात राहिलो आहे, सुट्टी संपल्यानंतर वसतिगृहात परतल्यावर काही दिवस एखाद्या नीर्पराध कैद्याला तुरुंगात डांबून ठेवावे असे वाटायचे पण तुम्ही माझ्यावर मायेचा वर्षाव केला.
आमच्या गावात शिक्षकांना मास्तर म्हणतात मला असे लोक अडाणी वाटायचे पण आता समजते तुम्ही खरे खुरे मास्तर आहात कारण मास्तर म्हणजे “मातेच्या स्तरावर जो विद्यार्थ्यांशी संवाद साधतो त्याला मास्तर म्हणतात” तसं मास्तर आम्ही फार भाग्यवान आहोत काही शाळेत teacher असतात त्यातील काही या शिक्षकीपेषाला काळिमा फासणारे असतात-- शिक्षक शोषक होत आहेत का?
म्हणून आम्ही फार भाग्यवान आहोत तुम्ही आम्हाला स्वतःच्या लेकरासारखे सांभाळले.
आई-वडिलांपासून लांब असणाऱ्या लेकराचे माय-बाप होण्याचे प्रशिक्षण तुम्ही कुठे घेतले?
त्यामुळे हे सर्व येतं कुठून? हा प्रश्न कायम माझ्यातील सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देतो.
मला आठवतं आपण एकदा मी नववीत असताना बुद्धिबळाच्या स्पर्धेला गेलो असताना मी फार तणावात होतो त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात “जिंकणाऱ्याला पदक नक्की दिले जात असले तरी हरणाऱ्याला फाशी देण्याचा नियम नाही” तुमच्या या वाक्यामुळे आज देखील स्फूर्ती मिळते.
मी दहावीत असताना बुद्धिबळ खेळात राज्यस्तरीय स्पर्धेत मला सवर्ण पदक स्वीकारताना पाहून माझ्या पेक्षा तुम्हाला जास्त आनंद झाला होता.
आजवर दृष्टिबाधित विद्यार्थ्यांविषयी शैक्षणिक अंधश्रद्धा फार पसरल्या असताना पाचवीत असताना नौदायी परीक्षेला बसण्याचा घाट तुम्ही घातला आणि शाळा सुटल्यावर १ तास मला शिकवत होते. तरी त्या परीक्षेतील बुद्धिमत्तेचा पेपर त्यातील आकृत्यांमुळे मला सोडवता आला नाही म्हणून मी तुमच्या स्वप्नांना सत्यात उतरवू शकलो नाही. तरी देखील तुम्ही अपयशात यशाचा आनंद शोधायला शिकवले. महाराष्ट्रातील बोटावर मोजण्या एवढ्या मोजक्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांनी हि परीक्षा दिली असेल त्यात माझे देखील नाव आहे याचा मला अभिमान वाटतो.
मी सातवीत असताना अकोला आकाशवाणीवर “दृष्टीकडून अंतर्दृष्टीकडे” या कार्यक्रमासाठी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मला बोलता आले खरं तर त्या मागे माझी काही कर्तबगारी नाही फक्त माझ्यावर असणारा तुमचा दृढ विश्वास मला ते व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकला.
१०वीत केवळ ७४ टक्के मिळाले असताना तुम्ही वर्तमान पत्रात माझ्यावर लेख लिहिला हे भाग्य माझ्या वाट्याला यावे यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकते.
अशा कितीतरी आठवणी आहेत सर्व येथे नमूद करणे शक्य नाही. अगदी थोडक्यात सांगायचे झाल्यास भगवान बुद्धानी सांगितलेले प्रज्ञा, शील, करुणा हे तत्त्व तुम्ही माझ्या रक्तात उतरवले.
मी अकरावीतत महाविद्यालयात प्रवेश मिळवला आणि माझे नवीन जीवन सुरु झाले.
इंग्रजी माध्यमाच्या महाविद्यालयात माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलाचा टिकाव लागेल का?
माझ्या चेहऱ्यावरचे भाव ओळखून तुम्ही सांगितले “ या महाविद्यालयात जे विद्यार्थी मातृ भाषेत शिक्षण घेतात तेच पहिले येतात”
कला शाखेच्या पहिल्या वर्गाचा निकाल जाहीर झाला .त्यावेळी कला शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याने तुम्ही सांगितलेला इतिहास कायम ठेवला त्यासाठी तुमचे आभार व्यक्त करायला शब्द नाहीत.
महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेसाठी तुमचे मला कायम प्रोत्साहन मिळत राहिले.
गेल्या कित्त्येक वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे N S S दृष्टिबाधित विद्यार्थ्यांपासून लांब होते पण तुमच्या पाठिंब्यामुळे मी त्या समूहात सहभागी होऊ शकलो.
महामारी सुरु झाली आणि आपले जीवन सर्वांगाने बदलले on line वर्ग सुरु झाले; त्या आभासी वर्गात तुम्ही प्रत्येक्ष समोर बसून आम्हाला शिकवत आहात असा भास व्हायचा.
माझ्या नेटवर्क तसेच अनेक तांत्रिक अडचणी समजून तुम्ही माझ्यासाठी प्रसंगी फोन करून विशेष तास घेतला.
तृतीय वर्षाच्या दोनीही सत्रात परीक्षा शुल्क तुम्ही भरले. आणि परीक्षा संपल्यावर तुम्ही म्हणालात “केवळ आर्थिक अडचणी आहेत म्हणून शिक्षण थांबवू नको अथवा त्यात खंड पडू देऊ नकोस तुला आवश्यकता असेल त्यावेळी मी तुझा सर्व शैक्षणिक खर्च उचले”
तुम्ही आम्हाला कायम आपल्या पेक्षा जास्त संघर्ष करणाऱ्या बिकट परिस्थितीशी झुंजणाऱ्या विद्यार्थ्यांशी मैत्री करायला शिकवले; त्याचबरोबर त्यांना मदत करायचे संस्कार आमच्यावर केले. म्हणून मी या पासून संपूर्ण आयुष्यभर अशा गुणवंतांचा आधार होण्याचा प्रयत्न करणार.
गुरुजी खूप व्यक्त व्हायचे आहे पण शब्द सुचत नाहीत; कदाचित तुम्हाला अपेक्षित असणारा विद्यार्थी मी होऊ शकलो कि नाही माहिती नाही; पण सर्व विद्यार्थ्यांना हेवा वाटावा असे शिक्षक मला मिळाले.
आपला विश्वासू,
तुमचा विद्यार्थी,
प्रतीक राऊत.
दिनांक ०५-०९-२०२१
फोटो - pixabay aap
खूप सुंदर व भावनिक लिहिले आहे.
उत्तर द्याहटवाVery good Pratik!! Thank you!!
उत्तर द्याहटवा