आजचे लोकमान्य

भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही मानवतेच्या स्वातंत्र्याची चळवळ होती. या आंदोलनात राजकीय स्वतंत्र बरोबरच सामाजिक स्वातंत्र्य प्रस्थापित करणे हा उदात्त हेतू होता. त्यामुळेच जगातील अनेक देशांनी आपल्या स्वातंत्र्य पासुनच प्रेरणा घेऊन त्यांच्या देशात लढा उभा केला. यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या कर्तृत्वातून चळवळ उभी केली आणि विचारांचे बीज पेरले त्याची वटवृक्ष आज आक्राळ-विक्राळ रूप घेऊन आमच्या जीवनातील प्रत्येक घटनेत मार्गदर्शन करीत आहे काही हेतू निर्णय हे तात्कालिक होते तर काही त्रिकालबाधित प्रेरणा देणारी ठरले त्यातीलच भारतीयांच्या मनातील खडखड  व्यक्त करणारा असंतोष ब्रिटिशांसमोर मांडणारे बाल गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक आज यांची जयंती त्यानिमित्ताने सर्वप्रथम त्यांच्या अफाट कर्तुत्वाला त्रिवार वंदन. 

लोकमान्यांची ओळख आम्हाला राजकीय नेता, ज्वलंत प्रश्न उठवणारा पत्रकार, गीतारहस्य सारखा ग्रंथ लिहिणारा ग्रंथकार,  होमरूल सारखी चळवळ डॉक्टर यांनी बेझंट यांच्या सोबतीने सुरू करणारा चळवळीतील कार्यकर्ता एवढेच नाही तर त्या पलीकडे स्वराज्य राष्ट्रीय शिक्षण स्वदेशी आणि बहिष्कार ही चतुःसूत्री देणारा मार्गदर्शक या पर्यंत येऊन पोहोचते म्हणूनच पत्रकार व्हॅलेंटाईन चिरोल यांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले असावे.  त्या काळात जहाल गटाच्या  लाल बाल पाल या त्रिकुटाने संपूर्ण देश स्वातंत्र्यासाठी सज्ज केला पण एकीकडे त्यांची हि दैदिप्यमान कीर्ती आपल्या सगळ्यांना ज्ञात असताना आज शतकोत्तर टिळक समजून घेताना त्यांनी दिलेली चतु:सूत्री आजच्या काळात आपण कोणत्या प्रकारे अंमलात आणू शकतो याचा विचार करणे आवश्यक आहे आणि टिळक आचरणात उतरवण्यासाठी गरजेचे आहे त्याचाच प्रयत्न आपण आजच्या लेखात करणार आहोत.

स्वराज्य-  स्वराज्य आणि स्वातंत्र्य या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. टिळकांनी स्वराज्य ही संकल्पना गोर्‍यांचे राज्य जाऊन भारतीयांचे राज्य प्रस्थापित व्हावे आणि इथल्या जनतेच्या हिताचे निर्णय इथल्या जनतेच्या प्रतिनिधींनी घ्यावे या हेतूने केला असावा ;परंतु आज राजकीयदृष्ट्या आपण स्वतंत्र झालो आहोत आपल्यावर कोणत्याही परकीय व्यक्तीची गुलामगिरी नाही आणि म्हणुन आपला देश सार्वभौम आहे पण आजही आपल्याकडे सामाजिक दृष्ट्या मागासलेपणा दिसतो त्यामुळे सामाजिक स्वातंत्र्य समानता प्रस्थापित झाली पाहिजे, त्याच बरोबर आर्थिक दृष्ट्या असणारे विषमता जाऊन प्रत्येकाला कोणासमोरही पैशासाठी हात पसरण्याची वेळ येऊ नये ; इतपत श्रीमंती असावी त्याचबरोबर दारिद्र्य असलेल्या देशातील सर्व लोक दारिद्र्य मुक्त व्हावे आणि प्रत्येकाला हा देश माझा आहे. इथल्या प्रत्येक साधनसंपत्तीवर माझा अधिकार आहे. हे ठाम पणे सांगता यावं इतपत प्रगतीची शिखरे आपल्याला गाठायचे आहे .त्याही पुढे जाऊन स्वराज्य म्हणजे स्वतावर राज्य स्वतःच्या इंद्रियांवर राज्य स्वतःच्या विचारांवर राज्य आज अनेक प्रसारमाध्यमे ब्रेन वॉशिंग अर्थात मेंदूत  विशिष्ट विचारधारा पेरून आपल्याला वैचारिक गुलाम करतात. त्यातून हे बाहेर येणे क्रमप्राप्त आहे. 

 स्वदेशी ही संकल्पना तितकीच महत्त्वाची आणि कालानुरूप बदलली आहे. जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर आपल्याकडे सर्व काही आपल्या देशातून उत्पादन घेता येईलच अशी संधी नाही किंबहुना ती काळाची गरज देखील नाही प्राप्त परिस्थितीत आपल्या देशातील उत्पादनांना अधिकाधिक प्राधान्य देणे त्याचबरोबर आपल्या स्थानिक उद्योजकांना मोठे करणे कुटीर उद्योग हस्त उद्योग किंबहुना महिलां बचत गटाद्वारे चालणाऱ्या उद्योगाला चालना देणे आवश्यक आहे.  लोकमान्यांनी विदेशी मालाची होळी करून ब्रिटीशांचा विरुधात  स्वातंत्र्य लढा तीव्र केला. आजच्या काळात विदेशी मालाची होळी करणे आपल्यासाठी मारक ठरणार म्हणून व्यापक हित लक्षात घेता जाणीवपूर्वक विदेशी मालाला नाकारून स्वदेशी ला प्राधान्य देणे हिताचे होईल. 

राष्ट्रीय शिक्षण ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी साम्राज्यवादाची मुळं उपटून टाकण्यासाठी आणि देशभक्तीचा वारा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वाहावे या  हेतूने सुरू केले, त्यातूनच न्यू इंग्लिश स्कूल आणि नंतर फर्ग्युसन महाविद्यालय उदयास आले आजच्या परिस्थितीत मातृभाषेत कडून इंग्रजी शिक्षणाचा वेग वाढला आहे त्यामुळे आपली संस्कृती ऱ्हास पावत आहे आणि इथली तरुण पिढी व्यक्तिवादी होत असताना उद्योजक न होता नोकरदार होण्यात धन्यता मानते; त्याच बरोबर आपल्या देशात प्रांत-प्रांतानुसार इतिहास शिकवला जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्रातच शिकवला जातो तर  राणा प्रताप यांचा इतिहास राजस्थान यापुरता मर्यादित ठेवला आहे हे सर्व राष्ट्रीय नायक आपल्या अभ्यासक्रमात उतरवणे गरजेचे आहे त्याच बरोबर महापुरुषांच्या इतिहासातील केवळ थोड्या थोड्या घटना सनावळ्या एवढ्यापुरताच आम्हाला इतिहास सांगत असताना त्यांची मूल्ये त्यांनी दिलेली शिकवण यापासून आमच्या पुस्तकाने फारकत घेतली आहे हा बदल करणे गरजेचे आहे .शासन व्यवस्था करेल अथवा नाही परंतु राष्ट्रीय शिक्षण घेण्यासाठी या देशाचा विद्यार्थी म्हणून आपण आपल्या परीने प्रयत्न करणे टिळकांनी दिलेल्या शिकवणुकीला आचरणात आणण्याचा उत्तम मार्ग ठरेल . 

बहिष्कार वर नमूद केलेल्या सर्व तत्त्वांमध्ये त्यांनी विदेशी गोष्टी विदेशी उत्पादने  विदेशी शिक्षण किंबहुना ब्रिटिशांना केले जाणारे सहकार्य या सर्व गोष्टींवर स्वातंत्र्य चळवळीला एक नवीन दिशा दाखवली होती ,आजच्या काळात आपल्यासमोर अनेक गोष्टी आहेत यांवर बहिष्कार टाकल्याने सामाजिकदृष्ट्या आपण स्वतंत्र होऊ जातीव्यवस्था धर्म व्यवस्था यात माणसं भरडले जातात त्याचबरोबर प्रसारमाध्यमांवर किंवा समाज माध्यमांवर प्रकाशित होणाऱ्या जाहिराती लोकांना भुरळ घालून भ्रम पसरवतात अशा जाहिरातींपासून सावध राहून ग्राहकांचे हित जोपासणे आणि अफवांना किंबहुना भ्रामक जाहिरातींना आपल्यापासून दूर ठेवून त्या  माध्यमातून होणारी आपली फसवणूक टाळणे आवश्यक आहे. बदलत्या युगात तत्व बदलली आपले राहणीमान बदलले आपण तंत्रज्ञान स्वीकारले पण अज्ञान आपल्यातून नष्ट झाले नाही. या अज्ञानाने मानवी प्रगतीचा रथ हा चिखलात अडकला  आहे अत्यंतिक राष्ट्रवादाला भुलून देशातच दोन धर्मांमध्ये वादंग काही समाजकंटक निर्माण करतात तर अनेक लोक आपल्याला वैचारिकदृष्ट्या गुलाम ठेवतात .या सर्व बाबी सर्वांगीण विकासआस्  बाधक आहेत त्यामुळे यावर बहिष्कार टाकून नवीन तत्त्वास नवीन गरजा समोर ठेवून लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी दिलेली विचारसरणी आपण आयुष्याचा भाग बनवायला पाहिजे त्यातूनच त्यांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करत असताना आपणही लोकमान्य  टिळकांच्या स्वप्नातील भारत घडवण्याचा प्रयत्न करू  त्यासाठी उत्तम नागरिक होणे आवश्यक आहे. 

असे म्हणतात 

;"थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा।

 आपण त्यांच्या समान व्हावे हाच घ्यावा बोध खरा ।।

फोटो - साभार गूगल

    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुरुषांचा महिला दिन

जातीय व्यवसतेला प्रेमाचे आव्हान

एक होते गाडगे बाबा